माण परिसरातील ' पीएमआरडीए ' तर्फे अतिक्रमणांवर कारवाई
पिंपरी, ता. १७ : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. त्या अनुषंगाने बुधवारी हिंजवडी परिसरातील अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या भागातील अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी माण गावातील गट क्रमांक १६६ मधील ओढे - नाल्याभोवती असलेल्या २८ बांधकामांचे अतिक्रमण काढण्यात आले. यासह विप्रो सर्कल परिसरातील माऊली हॉटेलवरचे अतिक्रमणही काढले. संबंधित कारवाई पीएमआरडीए, एमआयडीसीसह इतर सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात आली.
वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, या उद्देशाने अतिक्रमणधारकांचा सर्वे करण्यात येत असून त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. त्यामुळे हिंजवडीसह परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत: आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांनी केले आहे. यासह कोणतेही बांधकाम करताना पीएमआरडीएची पूर्वपरवानगी घेऊनच करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
------------------