मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे २७ हजार जणींनी भरले अर्ज
पिंपरी, ता. २३ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना व्हावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १२३ सुविधा केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्यात येत असून ही संख्या वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहोत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी केले.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. यानुसार महापालिकेच्या वतीने १२३ सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या सुविधा केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्यात येत असून २१ जुलै पर्यंत २७ हजार १८६ अर्ज दोन्ही पद्धतीने भरण्यात आले आहे.
यावेळी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अण्णा बोदडे, डॉ. अंकुश जाधव, राजेश आगळे, सीताराम बहुरे, उमेश ढाकणे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयात ४ हजार ५३१ अर्ज भरण्यात आले. ब क्षेत्रीय कार्यालयात एकूण २ हजार ३३ अर्ज, क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण २ हजार ४१७ अर्ज, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४ हजार २२ अर्ज स्वीकारण्यात आले आहे. ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २ हजार ३८० अर्ज तसेच फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण २ हजार ७५८ अर्ज, ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४ हजार ७४१ अर्ज, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ४ हजार ३०४ अर्ज स्वीकारण्यात आले.
या योजनांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी १२३ सुविधा केंद्र, ८ ऑफलाईन अर्ज स्वीकृती केंद्र, ८० कोपा पास कर्मचारी, ८१ डाटा एन्ट्री ऑपरेटर, १०४ मनपा शाळेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर, २३७ महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहयोगिनी ही यंत्रणा कार्यरत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींनीसाठी सुविधा केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार कोणत्याही पद्धतीने अर्ज भरता येऊ शकतो. लाभार्थ्यांनी अर्ज भरताना योग्य माहिती देणे महत्वाचे असल्याचे समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरून घेणे आणि अर्ज भरणाऱ्या कर्मचा-यांकडून रोजचा अहवाल मागविणे ही क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. क्षेत्रीय अधिका-यांना दिलेली जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पार पाडावी असे आवाहन समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.
-------------
