महापालिकेच्या तिजाेरीत दाेनशे काेटींचा महसूल जमा
पिंपरी, ता. २२ : '' चालू आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात २५ टक्के मालमत्ता धारकांनी दाेनशे काेटी रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतीच्या लाभ घ्यावा,'' असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (ता. २२) केले.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा सहा लाख २८ हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे.
शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्र लाभ घेता येईल.
चौकट - अशा आहेत विविध 'कर सवलत योजना'
मालमत्तांचा प्रकार सवलत मिळणारी टक्केवारी
आगाऊ मालमत्ता कर ५ टक्के
महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास ३० टक्के
४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर मालमत्तेस ५० टक्के
स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास ५० टक्के ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्यांना ३० जूनपर्यंत ५ टक्के
जुलै ते सप्टेंबरअखेर पर्यंत भरणा करणाऱ्या ४ टक्के
स्वयंफूर्तीने माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत मालमत्तांची नोंदणी केल्यास ५ टक्के
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के
संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात १०० टक्के
चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात ५ टक्के
कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना ५ पासून १० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन बिल्डिंग रेटींग तीन ते पाच रेटींगपर्यंत ५ पासून १५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
कोट
गतवर्षी २०२३ - २४ च्या पहिल्या तिमाहीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत तब्बल ४४७ कोटी रुपयांचा कर भरणा केला होता. यंदाही दीड महिन्यात १ लाख ८१ हजार ९६८ जणांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत कर भरला आहे.
- नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.
----------------
