24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित 'विद्युत व लिफ्ट सुरक्षा' कार्यशाळा उत्साहात

पिंपरी, ता. ३ : पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘विद्युत सुरक्षा व लिफ्ट सुरक्षा’ या विषयावर आयोजित एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा येथे उत्साहात झाली. 


पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महानगरपालिकेचे सह-आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत गांगुर्डे, विद्युत विभागाचे सह शहर अभियंता माणिक चव्हाण, विद्युत निरीक्षक नितीन सूर्यवंशी, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी उपस्थित होते.


महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजच्या कामकाजात विद्युत आणि लिफ्ट सुरक्षेबाबत जागरूक, दक्ष व तत्पर ठेवणे, या मुख्य उद्देशाने आयोजित या कार्यशाळेमध्ये एलिव्हेटर्स ब्रदर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. म. ज्ञा. शिंदे व ह. अ. नाईक यांनी लिफ्ट सुरक्षा या विषयावर सादरीकरण व प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्युत निरीक्षक नि. ग. सूर्यवंशी आणि नि. धो. मुळुक यांनी ‘वीज सुरक्षा’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

 

विजेच्या अपघातांची कारणे, सुरक्षा उपाय, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर, सेफ्टी साहित्यांचा सुरक्षित वापर, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद, यावर सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. बचाव कार्यासाठी आवश्यक सीपीआर तंत्र, विद्युत अपघातांमुळे शरीरावर होणारा परिणाम, यावरही सविस्तर चर्चा कार्यशाळेमध्ये करण्यात आली. तसेच अग्निशमन विभागाला लिफ्ट बचावासाठी आवश्यक असलेल्या 'लिफ्ट रेस्क्यू कीज' भेट म्हणून यावेळी देण्यात आली. या चाव्यांच्या मदतीने आपत्कालीन प्रसंगी लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांचे अधिक जलद व सुरक्षित बचाव करणे शक्य होणार आहे.

-------------