महानगरपालिकेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
पिंपरी, ता. २४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन दिनांक २५ जून आणि २६ जून रोजी करण्यात आले आहे. या पर्वात १० वी १२ वी च्या विध्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन , शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, प्रात्यक्षिक, मर्दानी खेळ, शाहीरी तसेच लोककलेचे कार्यक्रम आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मागोवा घेणा-या नाट्य, नृत्य आणि संवादाच्या भव्य कार्यक्रमांचा समावेश आहे. नागरिकांनी या प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२४ या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. यासोबतच विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२४ हा कार्यक्रम, २५ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता संभाजीनगर येथील साई उद्यान, चिंचवड याठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते होईल. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे हे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच १० वी, १२ वीच्या विध्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता भूपाळी, वासुदेव, पिंगळा, शेतकरी व कोळी नृत्य, नाट्यांचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार २६ जून रोजी सकाळी १०.०० वाजता शिवकालीन दुर्मिळ शस्त्रे तसेच विविध शिवकालीन, मध्यकालीन, दस्तऐवजांचे भव्य प्रदर्शन साई उद्यान संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले असून सकाळी १० वाजता शिवकालीन युध्द कला प्रात्यक्षिक आणि मैदानी खेळांचे आयोजन के.एस.बी. चौक, छत्रपती शाहूमहाराज पुतळ्या समोरील मोकळ्या मैदानात करण्यात आले आहे. सायंकाळी ५.०० वाजता शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून सायंकाळी ७.०० मराठमोळ्या लोककलेचा कार्यक्रम लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
---------------
