24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महानगरपालिकेने सोडला एक लाख बांबू लागवडीचा संकल्प

पिंपरी, ता. ८ : शहर हरित करणे तसेच जैव कुंपण निर्मितीकरीता महापालिकेच्या वतीने एक लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला असून या बांबू रोप लागवड कार्यक्रमाची सुरवात सोमवारी (ता. ८) बर्ड व्हॅली चिंचवड येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते बांबू रोपाची लागवड करून करण्यात आला.


  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने चिंचवड येथे मानवेल जातीच्या बांबू रोपाची लागवड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.


यावेळी उपस्थितांनी "आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ.आम्ही या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला व वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू " अशी शपथ घेतली.


बांबू वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करून देतात तसेच ते हवा शुद्ध करण्याचे कार्य देखील करतात. बांबू वृक्षांमुळे जमिनीची धूप होणे रोखले जाते आणि पर्यावरण संतुलन राखला जातो असे अनेक फायदे बांबू वृक्षाचे असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.


--------------