30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

पिंपरी, ता. २४ : पिंपरी चिंचवड नगरी ही स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता विषयक काम करणा-या कर्मचा-यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांचे आरोग्य उत्तम रहावे याकरीता महापालिकेच्या वतीने त्यांच्यासाठी वर्षातून दोन वेळा त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. यामुळे त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहणे शक्य होते, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मंगळवारी (ता. २४) 


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत " स्वच्छता ही सेवा " ह्या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात "स्वभाव-स्वच्छता, संस्कार- स्वच्छता" यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर झाले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते.


     या शिबिरात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, थेरगाव रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र फिरके, भोसरी रुग्णालयाचे डॉ. शिवाजी ढगे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे, सुधीर वाघमारे, राजू साबळे, शांताराम माने, के. पी. एम. जी. संस्थेचे विनायक पदमाने, आरोग्य विभागाच्या शितल पवार तसेच आरोग्य कर्मचा-यांची उपस्थिती होती.


महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवकांसाठी आवश्यक ती साधने पुरविण्यात आलेली असून त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी वर्षातून दोन वेळा त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते, त्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार,मार्गदर्शन व तज्ञांचा सल्ला देण्यात येतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते, असे मत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्‍मण गोफणे यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमात कमलेश गायकवाड, विजय गाडे, राजू शेख या सफाई सेवकांचा तसेच गंगा खलसे, शिला आढाव, मंगल देवकुळे या सफाई सेविकांचा विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शिबीरात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर सी यु ई एस मधून डॉ. मुकेश कुलकर्णी आणि प्राची मेंढे यांनी विविध नागरी सामाजिक संरक्षण योजना आणि स्वच्छता कामगारांच्या आरोग्याचे महत्त्व या विषयांवर व्हिडीओ चित्रफीतीद्वारे सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी  स्वच्छतेची शपथ घेतली.


आरोग्य शिबिरात अ,ब,ड,ग आणि ह प्रभागातील स्वच्छता विषयक काम करणा-या संस्थांचे १८०० पैकी १४५० कर्मचाऱ्यांची रक्त, साखर, ब्लड प्रेशर इत्यादींची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय उपचार करण्यात येतील अशी माहिती डॉ. शिवाजी ढगे यांनी दिली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

-----