25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महानगरपालिकेच्या तिमाहीत ५२२ कोटी कर वसुलीच्या यशानंतर कर्मचाऱ्यांचा गौरव

पिंपरी, ता. २ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच ९० दिवसांच्या कालावधीत ५२२ कोटी रुपयांची ऐतिहासिक करवसुली करून नवा विक्रम केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कर वसुली मोहिमेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १० कर्मचारी आणि तीन विभागीय कार्यालयांच प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, करसंकलन विभागाचे कार्यालय अधिक्षक चंद्रकांत विरणक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  


या प्रसंगी आयुक्त शेखर सिंह म्हणाले , " महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली कार्यक्षमता आणि निष्ठा अत्यंत प्रशंसनीय आहे. पहिल्या तिमाहीतच ५२२ कोटी रुपयांची वसुली करणे हे महानगरपालिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी कर संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या कार्यक्षमतेमुळे आम्ही या आर्थिक वर्षात १२०० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य गाठू शकतो. '' 


मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामकाज केल्यामुळे वाकड, चिखली, मोशी या विभागीय कार्यालयांसह सहायक मंडलाधिकारी अजित नखाते, मिनाक्षी पवार, बाळू लोंढे, लिपिक संतोष हाके, प्रकाश सदाफुले, कांचन भवारी तसेच शिपाई सदाशिव कोंडे, सागर रोकडे, प्रविण फुलावरे व माजी सहाय्यक आयुक्त नाना मोरे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच आयुक्त शेखर सिंह यांनी फॉक्सबेरी टेक्नोलॉजी टीमचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले. सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेश उपक्रमांतर्गत कर आकारणी व कर संकलन विभागामध्ये माहिती विश्लेषण, प्रभावी जनजागृती, घरपोच बिल वाटप यासह इतर कामांत फॉक्सबेरी टेक्नोलॉजी टीमने करदात्यांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वपूर्ण मदत केल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 


चौकट-

तीन विभागीय कार्यालयांची उल्लेखनिय कामगिरी.

वाकड – ६५ कोटी ११ लाख 

चिखली – ३९ कोटी ३५ लाख 

मोशी – ३० कोटी ५३ लाख 

.....


चौकट- 


आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या या दोन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर संकलनात उल्लेखनीय वाढ दिसून आली आहे. मात्र १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. यात महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना ३ लाख २३ हजार २३९ नागरिकांनी तब्बल ३८० कोटींपेक्षा जास्त कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे.


कोट-

कर संकलन ही केवळ आर्थिक प्रक्रिया नसून, ती महानगरपालिकेच्या विकासात्मक दृष्टिकोनाची मूर्त अभिव्यक्ती आहे. या मोहिमेत सहभागी प्रत्येक कर्मचाऱ्याने टीमवर्क, नियोजन आणि नागरिकांशी सकारात्मक संवाद याचा उत्तम नमुना सादर केला आहे. ही कामगिरी केवळ प्रशंसनीय नाही तर इतर महानगरपालिकांसाठीही प्रेरणादायी आहे, पुढील काळात करदात्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन उपक्रमांतर्गत डिजिटल माध्यम, डेटा विश्लेषण अधिक प्रभावी वापर, करजागरूकता मोहीमा, वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, तसेच प्रभागस्तरावर कार्यक्षम पथकांची स्थापना या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

------------------