महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार ‘शैक्षणिक किट’
पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच म्हणजेच १५ जूनपासूनच शैक्षणिक साहित्यांचा समावेश असणारे एक किट देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्यामुळे अडचण येऊ नये, यासाठी लवकरात लवकर शैक्षणिक किटचे वितरण पूर्ण व्हावे, यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक किट वितरण प्रक्रिया ई-रुपी (e-Rupi) या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यामध्ये ई-रुपी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुरक्षित, रोखविरहित व्यवहार करून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. या किटमध्ये यंदा पालक आणि शाळांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा विचार करून काही नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या वस्तू या किटमध्ये आहेत. मागील वर्षी ई-रुपी प्रणाली अंतर्गत ५१ हजार २०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले होते. तर, यावर्षी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही लाभ
यंदाच्या वर्षी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही डीबीटी योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक किट मिळेल. या किटमध्ये टिफिन बॉक्स आणि चित्र काढण्यासाठी उपयुक्त असे रंग, यासारख्या नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शाळांमध्ये उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १० जुलैपासून दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू होणार आहे.
......
चौकट
अशी आहे ई-रुपी प्रक्रिया
- ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर असून यासाठी बँक खाते आवश्यक नाही.
- यामध्ये लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे प्री-पेड क्युआर कोड व्हाउचर मिळते.
- व्हाउचर केवळ शाळा साहित्य खरेदीसाठीच वापरता येते.
- यासाठी फक्त १० अंकी वैध संपर्क क्रमांक आवश्यक.
- अतिरिक्त सुरक्षेसाठी ओटीपीद्वारे व्यवहार पडताळणी.
कोट
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यादृष्टिने यावर्षी आम्ही डीबीटी प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा केल्या आहेत. ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. या प्रक्रियेद्वारे करण्यात येणाऱ्या प्रत्येक किटचे वाटप ओटीपी पडताळणीद्वारे सुरक्षित, जलद पद्धतीने होणार आहे.
- विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
...........