24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महानगरपालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यमिक शाळेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, ता. ३ : '' महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, येथील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी नक्कीच शहराचे नाव राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर उंचावतील,'' असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (ता. ३) व्यक्त केला.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फुगेवाडी येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक विद्यामंदिर शाळेच्या नवीन इमारतीमध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.


या उद्घाटन समारंभास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक राहुल अडवानी, आयटीच संस्थेच्या संचालक नेहा वैद्य, सिनियर गव्हरमेंट पार्टनरशिप असोसिएट गितेश शिनगारे, शंकर शिर्के, महेंद्र भोर, बजाज ग्रुप सीएसआर अध्यक्ष कुरूष इराणी तसेच आयटीच संस्थेचे प्रतिनिधी आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.


आयुक्त शेखर सिंह म्हणाले, '' महानगरपालिकेच्या सध्या इंग्रजी माध्यमांच्या दोन प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळा शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येतात. माध्यमिक शाळांची तरतूद नसल्याने नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खाजगी शाळांचा पर्याय शोधावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यां-ची गळती होण्याची शक्यता फार असते. तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या वातावरणात रुळायला व त्यांच्या शिक्षण पद्धती आत्मसात करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या या समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक - खाजगी भागीदारीतून आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी हि माध्यमिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे.  


 २३८ विद्यार्थी घेत आहेत इंग्रजी माध्यमिक शिक्षण

चिंचवड महापालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर, फुगेवाडी येथील शाळेच्या नवीन इमारतीमध्ये आयटीच (iTEACH) या संस्थेद्वारे आठवी ते दहावीची इंग्रजी माध्यमिक शाळा सुरु करण्यात आली आहे. शाळा चालविण्यासाठी आयटीच (iTEACH) संस्थेला महापालिकेच्या वतीने आवश्यक वर्ग खोल्या, भौतिक सुविधा तसेच वीज व पाणी पुरवठा अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. फुगेवाडी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ही इंग्रजी शाळा चालविण्याची पूर्ण जबाबदारी आयटीच (iTEACH) संस्था घेणार आहे. त्यामध्ये शाळेचे रोजचे संचलन, शाळा मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पध्द्ती, प्रगती मूल्यमापन इत्यादी सर्व कार्य व यासाठी आवश्यक खर्च आयटीच संस्था देणगीदार संस्थांमार्फत करणार आहे. आयटीच संचलित शाळेमध्ये एस.एस.सी. अभ्यासक्रम शिकविला जाणार असून केवळ महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश घेता येणार असून एकूण २३८ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. 


ब्लेंडेड लर्निंग लॅब (BLL)

शाळेमध्ये बीएलएल  ब्लेंडेड लर्निंग लॅबची सुविधा आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले शैक्षणिक अंतर भरून काढण्यासाठी या लॅबचा उपयोग केला जात आहे. शिक्षक मुलांना वर्गात एकाच पातळीचे शिक्षण देऊ शकतात. काही विद्यार्थ्यांना ते सोपे वाटू शकते किंवा काहींना ते अवघड वाटू शकते. यामुळे काही विद्यार्थ्यांचा सराव हा कमी पडतो. या लॅबच्या आधारे विविध ॲप व तंत्रज्ञांचा वापर केल्यामुळे विद्यार्थी त्यांना गरज असलेल्या शैक्षणिक पातळीवर शिकू शकतात. 

---------