25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महानगरपालिकेच्या जनसंवाद सभेत एकूण ८२ सूचना प्राप्त


पिंपरी, ता. १० : महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (ता. १०) घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी एकूण ८२ तक्रारवजा सूचना मांडल्या. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.


या जनसंवाद सभेत नागरीकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १६, ६, ६, १३, ५, ३, १४ आणि १९ याप्रमाणे एकूण ८२ तक्रारीवजा सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या.  


यावेळी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांची निगा राखणे, बंद असलेल्या विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करणे, फुटलेले चेंबर दुरुस्त करणे, राडारोडा उचलणे, रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करणे, शहरात विविध ठिकाणी धुरीकरण, औषध फवारणी करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे यासारख्या विविध तक्रारी नागरिकांनी मांडल्या.                                                   


    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जनसंवाद सभेसाठी मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.


महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयात घेण्यात येणाऱ्या जनसंवाद सभेत मुख्य समन्वय अधिकारी म्हणून खालील अधिकारी कामकाज पाहणार आहे.


 अ क्षेत्रीय कार्यालय - उपआयुक्त अण्णा बोदडे, ब क्षेत्रीय कार्यालय - सह शहर अभियंता विजयकुमार काळे,


क क्षेत्रीय कार्यालय - सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, ड क्षेत्रीय कार्यालय - उपआयुक्त पंकज पाटील,


इ क्षेत्रीय कार्यालय - सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, फ क्षेत्रीय कार्यालय - सह शहर अभियंता मनोज सेठिया,


ग क्षेत्रीय कार्यालय - उपआयुक्त मनोज लोणकर, ह क्षेत्रीय कार्यालय - उपआयुक्त निलेश भदाणे.

----------------