26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

महानगरपालिका १५ हरित मतदान केंद्रांवर भरविणार वनस्पतींचे माहिती प्रदर्शन

पिंपरी, ता. १८ : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ अशा एकूण १५ मतदान केंद्रांवर महापालिकेच्या वतीने “हरित मतदान केंद्र” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मतदान केंद्रांवर खास मतदारांसाठी विविध पाम प्रजाती, शोभिवंत झाडे, फळझाडे, आयुर्वेदिक औषधी वनस्पती अशा विविध वनस्पतींचे माहिती प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.


विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. बुधवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया होणार असून मतदानाच्या दिवशी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ अशा एकूण १५ मतदान केंद्रांवर महापालिकेच्या वतीने “हरित मतदान केंद्र” ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.


   पिंपरी मतदारसंघातील हरित मतदान केंद्रे 


पिंपरी विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या एकूण ५ हरित मतदान केंद्रे स्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय से.२५ येथील मतदान केंद्र क्र.५, आणि सेंट उर्सुला हायस्कूल तसेच संभाजीनगर येथील कमल नयन बजाज हायस्कूल मतदान केंद्र क्र.४१, दापोडी येथील गणेश इंग्लिश मेडियम स्कूल मतदान केंद्र क्र.३७० आणि हुतात्मा भगतसिंग विद्यामंदीर या शाळांच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर “हरित मतदान केंद्र” ही संकल्पना राबविण्यात येत आहे.     


 

  चिंचवड मतदारसंघातील हरित मतदान केंद्रे


चिंचवड विधानसभा मतदारसंघात नवी सांगवी येथील बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केंद्र क्र.४९९ , रावेत गाव येथे सिटी प्राइड स्कूलमधील मतदान केंद्र क्र. ४४, पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मधील मतदान केंद्र क्र. ३५८ आणि जी.के. गुरुकुल गोविंद गार्डन या ठीकाणी तसेच पिंपळे गुरव येथील महापालिकेची मुला मुलींची शाळा क्र. ५४/१ येथे हरित मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.    


   भोसरी मतदारसंघातील हरित मतदान केंद्रे 


भोसरी विधानसभा मतदारसंघात इंद्रायणी नगर येथील स्टर्लिंग स्कूल इमारत क्र. १ आणि स्वामी समर्थ इंग्लिश मेडियम स्कूल या ठिकाणी तसेच शाहूनगर येथील डी.वाय.पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, चऱ्होली येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, दिघी येथील रामचंद्र गायकवाड प्राथमिक शाळा या ठीकाणी हरित मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.


 हरित मतदान केंद्रांवर राबविण्यात येणाऱ्या वनस्पती प्रदर्शनातील “शोभिवंत झाडे माहिती प्रदर्शनामध्ये अनंत कुंदा, हॅमेलीया, जट्रोफा, अॅलामेंडा, जास्वंद आदी वनस्पतींचा समावेश आहे. तर “फळझाडे माहिती प्रदर्शनामध्ये” आवळा, जांभूळ, चिंच, पेरू, आंबा, सीताफळ, फणस आदी फळझाडांचा समावेश आहे. तसेच “आयुर्वेदिक औषधी वनस्पती” माहिती प्रदर्शनामध्ये कडूनिंब,अडुळसा,बकुळ,उंबर,कोरफड, शतावरी, पारिजातक आदी वनस्पतींचा समावेश असून “पाम प्रजाती” माहिती प्रदर्शनामध्ये आरेका,रॉयल, फिनिक्स, बिस्मार्कीया, बॉटल,रॅफिक्स आदी प्रजातींचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली. महानगरपलिकेच्या हद्दित्त येणाऱ्या तिनही मतदार संघातील सर्व मतदारांनी आपला मताचा अधिकार बजावावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी यावेळी केले.  

---------------------