महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
पिंपळे सौदागर, ता. १३ : मतदानाच्या दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई असताना देखील मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर त्यांचे 'मशाल' हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचे सोमवारी (ता. १३) पिंपळे सौदागर येथे आढळले. यासंदर्भात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर ' मशाल ' या निवडणूक चिन्हाचे स्टिकर लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड- उघड भंग आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.
वाघेरे यांच्या मोटारीवर मशालीचे स्टिकर असल्याचे फोटो व व्हिडिओ देखील तक्रारी सोबत जोडण्यात आले आहेत.
----------------