मागासवर्गीय जनतेसाठी विविध योजना आणण्याचा प्रयत्न : आमदार लांडगे यांची ग्वाही
पिंपरी, ता. १ : भोसरी, पिंपरी चिंचवडमधील मागासवर्गीय जनतेसाठी विविध प्रकारच्या प्रभावी विकास योजना आणि प्रकल्प राबविण्याचा भविष्यात प्रयत्न असेल, अशी ग्वाही भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिली.
भोसरी विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. यावेळी आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, बापू घोलप, डॉ. धनंजय भिसे, नितीन घोलप, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कीर्ती जाधव, मारुती जाधव, अरुण जोगदंड, युवराज दाखले तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४०० पेक्षा जास्त मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, '' आमदार महेश लांडगे यांनी केलेले भोसरी विधान सभेतील कार्य अतुलनीय आहे. मी आमदार होत असताना त्यांनी मला केलेले हक्काने मतदान हे समाज कधीही विसरणार नाही, आज भोसरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे संविधान भवन त्यांनी उभे करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठी मानवंदना दिलेली आहे, ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष असताना निगडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बांधण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला मनपाकडून मोठे अनुदान देण्याचे कामही ते करीत आहेत.'' त्यामुळें संपूर्ण मागासवर्गीय समाज महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या सोबत
असेल, व त्यांच्या विजयात भोसरी तील मागासवर्गीय जनतेचा मोठा वाटा असेल. असे आ. गोरखे म्हणाले.
आमदार महेश लांडगे यांनी येणाऱ्या काळामध्ये भोसरीतील मागासवर्गीय जनतेसाठी अनेक योजना आणण्याचा प्रयत्न असेल, असे सांगितले त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा समोर मांडला. कार्यक्रमाचे आयोजन मारुती जाधव यांनी केले. अरुण जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले. युवराज दाखले यांनी आभार मानले.
----------------------------------------
