लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर - प्रदीप जांभळे
पिंपरी, ता. ७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत एकूण ३ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. यामध्ये महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ च्या काळेवाडी येथील समस्या, लोकशाही दिन अर्जातील समस्या तसेच महत्वाचा दूरध्वनी क्रमांक असणारा फलक बसविणे याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यानुषंगाने लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिका-यांना त्याबाबत विविध सूचनाही केल्या.
या लोकशाही दिनानिमित्त नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये शहरातील सर्व स्मशानभूमी या सुशोभित कराव्यात, शहरातील सर्व उद्याने सुशोभित करणे, शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, नदीतील जलपर्णी काढावी, काळेवाडी परिसरातील क्रीडांगणाची संख्या वाढवावी, जिजाऊ क्लिनिक येथील रुग्णासाठी पत्रा शेड उभारणे, शहरातील बसस्थानकाजवळ स्वच्छता ठेवावी, कोकणेनगर श्रीकृष्ण कॉलनी येथील रस्त्यांचे ड्रेनेज गळतीचे काम पूर्ण दुरूस्त झाल्यावर डांबरीकरण करावे, अशा तक्रारवजा सूचना करण्यात आल्या.
यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, लोकशाही दिन समन्वयक उपआयुक्त राजेश आगळे, सहशहर अभियंता संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, किशोर ननवरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, विजय जाधव, किरण अंदुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता राजकुमार सूर्यवंशी, विकास घारे, मिनल दोडल, सागर देवकाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, तसेच तक्रारदारवजा सूचना करणारे नागरिक देखील उपस्थित होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी लिपिक प्राजक्ता झेंडे यांचे सहकार्य लाभले.
अर्ज स्विकृतीचे निकष
लोकशाही दिनासाठी दाखल करावयाच्या अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रती नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असेल. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.
कोट
महापालिकेच्या वतीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी मांडलेल्या तक्रार बाजा सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.
प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
--------------
