23.41°C Pune
Monday, March 16
Breaking News:
image

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होणार अनधिकृत फलक निष्कासनाची कारवाई

पिंपरी, ता. १८ :  ज्या जाहिरात फलकधारकांचे अनधिकृत फलक शहरातील कोणत्याही भागात असतील त्यांनी रविवार (ता. १९ ) या कालावधीपर्यंत त्यांचे फलक हटवावेत. विहीत कालावधीत अनधिकृत फलक हटविण्यात आले नाहीत तर सोमवार (ता. २० ) रोजी महापालिकेच्या वतीने संबंधित फलकधारक तसेच जागा मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच फलक निष्कासित करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच सांगितले. 


 शहरातील होर्डिंग्सबाबत महापालिका अधिकारी, जाहिरात फलकधारक यांच्यासमवेत झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे तसेच संबंधित अधिकारी आणि विविध जाहिरात फलक एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


पावसाच्या सुरूवातीस येणाऱ्या वादळ, वाऱ्यामुळे कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारच्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जिवीतहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. या घटना टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. 


फलकधारकाने या नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडणार नाहीत व कोणतीही हानी होणार नाही, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले. शहरातील सर्व जाहिरात फलक धारकांनी आपला परवाना दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. दरवर्षी ३१ मार्चपर्यंत विहीत वेळेत फलक धारकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसेल तर त्यांचा परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच प्रत्येक फलक धारकाने संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल ऑडिट सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक आहे. जे फलकधारक प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द केला जाईल. तसेच फलक उभारण्यात आलेल्या जागेवर संरचना अभियंत्याने पाहणी करूनच संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे तसेच जाहिरात फलकाची संरचना गंजू नये किंवा कमकूवत होऊ नये, यासाठी संरचना पेंटींग करणे बंधनकारक असणार आहे, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. 


तसेच जाहिरात फलक किंवा होर्डिंग लावताना फलकाच्या शेवटी नागरिकांसाठी सूचना लिहीणे गरजेचे आहे. या सूचनांचा नमुना महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने फलक धारकांना देण्यात येईल. होर्डिंगच्या खाली टपरी, दुकान किंवा अतिक्रमण केले गेले तर त्याबाबत फलक धारक किंवा जागा मालकांनी महापालिकेस कळविणे आवश्यक आहे. महापालिका संबंधित दुकान, टपरी किंवा अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करेल. 



कोट – अनधिकृत फलकांची तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट सारथीवर नवीन सुविधा लवकरच


पोस्ट अ वेस्टच्या धर्तीवर आता नागरिकांना अनधिकृत फलकांची माहिती महापालिकेस कळविता येणार असून स्मार्ट सारथी ऍप्लिकेशनवर महापालिकेच्या वतीने नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग्सवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.