कर संकलन विभागाकडून ६० दिवसांत ३०० कोटी वसूल
पिंपरी, ता. १ : '' पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने अवघ्या ६० दिवसांत तब्बल ३०८ कोटींचा कर वसूल केला आहे. विविध कर सवलतींचा लाभ घेत २ लाख ७१ हजार ५०३ मालमत्ताधारकांनी कर भरणा केला आहे. तसेच ३० जूनपर्यंत असलेल्या कर सवलतींचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा '', असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात ६ लाख ३० हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. गतवर्षी विभागातर्फे राबविलेले विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह सलग दुसऱ्यावर्षी महिलांच्या सिध्दी प्रकल्पाअंतर्गत बिलांचे घरपोच आणि वेळेत वाटप करण्यात आले आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणून मालमत्ता धारक कर संकलन कार्यालयासमोर अक्षरशः रांगा लावून कराचा उत्स्फूर्तपणे कर भरत असल्याचे चित्र प्रथमच दिसून येत आहे. यावरून शहरवासीयांनी शहर विकासात हातभार लावण्याची एक प्रकारे जबाबदारी स्वीकारली आहे.
६ लाख ३० हजार मालमत्तांपैकी २ लाख ७१ हजार ५०३ मालमत्ताधारकांनी ३०८ कोटी ४२ लाख ३१ हजार रुपयांचा कर जमा केल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
चौकट
ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती
कर संकलन विभागाने सर्व सेवा सुविधा ऑनलाइनच्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांचा मालमत्ता धारकांना प्रचंड मोठा फायदा होत असून करदाते दिवसेंदिवस ' हायटेक ' होत आहेत. तसेच ऑनलाइन कर भरणाऱ्यांना नागरिकांना ५ टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे २०२४ -२५ च्या आर्थिक वर्षांतील दोन महिन्यात १ लाख ९९ हजार ८०७ नागरिकांनी २१८ कोटी २९ लाख २९ हजार रूपयांचा ऑनलाइन कराचा भरणा केला आहे.
असा आला रुपया
ऑनलाइन-२१८ कोटी २९ लाख विविध ऍप - ८ कोटी ४८ लाख रोख -१९ कोटी ३२ लाख धनादेशाद्वारे-१२ कोटी ८१ लाख एनइफटी - ९ कोटी २१ लाख, इडीसी - १ कोटी ७१ लाख आरटीजीएस -१ कोटी ७२ लाख डीडी -७० लाख ८५ हजार रुपये
वाकड झोनमध्ये सर्वाधिक भरणा
कर संकलनासाठी शहरात १७ झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक ३९ हजार ७५९, सांगवीमध्ये २९ हजार ३८२, चिंचवडमध्ये २४ हजार १२४, थेरगावमध्ये २४ हजार ७२७ , पिंपरी वाघेरेमध्ये १८ हजार ५२९ मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी पिंपरी नगर झोनमध्ये फक्त ३ हजार १९ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.
---------------
