30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आवाहन

पिंपरी, ता. १४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ३० जून २०२५ पूर्वी मालमत्ता कर भरून महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.


नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन कर भरल्यास, त्यांना थेट १० टक्क्यांपर्यंत कर सवलत दिली जात आहे. तसेच, महिलांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांवर ३० टक्क्यांपर्यंत करसवलत दिली जात आहे. महानगरपालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्ता, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना सामान्य करात सवलत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विशेषतः महिला सवलतींचा लाभ घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि लोकाभिमूख सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने ऑनलाइन पद्धतीने 'मालमत्ता कर भरणा हस्तांतरण, थकबाकी नसल्याचा दाखला अशा प्रकारच्या सेवा दिल्या जात आहे. 


दरम्यान, सध्या महानगरपालिकेकडे थकीत मालमत्ता कराच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली असून, यात १० हजार पुढील सुमारे ७६ हजार ६८८ मालमत्ताधारांकडे ४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार मालमत्ता धारकांना पालिकेच्या वतीने थकबाकीची बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठविण्यात आली आहे. वेळेवर कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेला आर्थिक स्रोताची आवश्यकता असून, नागरिकांनी वेळेत कर भरून विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. 


.....


ऑनलाइन कर भरण्यास मिळतोय प्रतिसाद


आतापर्यंत ऑनलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या सुमारे १ लाख ८९ हजार ८२३ नागरिकांनी १० टक्के सवलतीचा लाभ घेतला असून, केवळ ऑनलाईन व्यवहारांमधूनच १८९.५२ कोटी रुपये जमा झाले आहेत.ऑनलाइन कर भरणा प्रणालीला पिंपरी चिंचवडकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.



कोट


शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणी, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या क्षेत्रात महापालिका सातत्याने काम करत आहे. यासाठी आवश्यक निधीचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे मालमत्ता कर. नागरिकांनी वेळेत कर भरून महानगरपालिकेच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे. ३० जूनपूर्वी कर भरणाऱ्यांना दिली जाणारी सवलत ही नागरिकांसाठी एक उत्तम संधी आहे. 


- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 


.....


कोट


करदात्यांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑनलाइन माध्यमातून कर भरल्यास १० टक्के सवलत, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना ३० टक्क्यांपर्यंतच्या लोकाभिमूख सवलत योजना आहे.थकीत कर न भरल्यास मात्र नियमानुसार जप्तीची कारवाई होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. - 


- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

--------------------