24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

जुन्नरमधील बोरी वीज उपकेंद्र सहा महिन्यांत पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, ता. २४ : जुन्नर तालुक्यातील बोरी (बु.) येथील महावितरणच्या नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राची उभारणी येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावी. बोरी बुद्रुक व शिरोली परिसरातील १२ गावांमधील प्रामुख्याने घरगुती, कृषिपंप व इतर ग्राहकांना या उपकेंद्रामुळे दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे. उपकेंद्रांची उभारणी वेळेत व दर्जेदार होईल याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २४) दिले.


महावितरणच्या मंचर विभाग अंतर्गत जुन्नर तालुक्यातील नवीन बोरी बुद्रुक येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, बोरी (बु)च्या सरपंच वनिता डेरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके, पांडूरंग पवार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता शांताराम बांगर उपस्थित होते.


जुन्नर तालुक्यातील बोरी (बु) व परिसरातील गावे व वाड्या वस्त्यांना महावितरणच्या शिरोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र शिरोलीचे उपकेंद्र अतिभारित झाल्यामुळे वीजपुरवठा कमी दाबाने होतो व खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर उपाय म्हणून बोरी (बु.) येथे कृषी धोरण २०२० योजनेतून ९ कोटी ८६ लाख रुपये खर्चाचे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रातून ११ केव्हीच्या ६ वीजवाहिन्या निघणार आहे. त्याद्वारे बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा, बोरी खुर्द गावठाण, वसईमळा तसेच वाड्यावस्त्यांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.


सोबतच सध्या अतिभारित शिरोली उपकेंद्राचा वीजभार देखील कमी होणार आहे. त्याचा फायदा औरंगपुरा, निमगाव, सावा, शिरोली, सुलतानपूर आदी गावांना होणार आहे. या उपकेंद्रासाठी ३३ केव्ही व ११ केव्हीच्या २४ किलोमीटर उपरी तर ७ किलोमीटर भूमिगत नवीन वीजवाहिन्या टाकण्यात येतील. तसेच उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीएचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात येणार आहे.


------