25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण...

पिंपरी, ता. १८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने टाळगाव चिखली येथे उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील आलाजीबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृह व कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८० उत्साहात झाले. तसेच त्यांनी संतपीठ येथील विविध विभागांना भेट देत प्रकल्पांचे कौतुक केले.


या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, अमित गोरखे, महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठचे अध्यक्ष शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, संतपीठ संचालक मंडळातील डॉ.सदानंद मोरे, संदीप खोत, तानाजी नरळे, संगिता बांगर, ह.भ.प. राजू महाराज ढोरे, डॉ.स्वाती मुळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक नामदेव ढाके, सुनिल लोखंडे, विकास डोळस, सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, दिनेश यादव, साधना मनेकर, अश्विनी जाधव, स्विनल म्हेत्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 


मुख्यमंत्री फडणवीस यांचे संतपीठामध्ये टाळ-मृदुंगांच्या निनादात अशा गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्षास भेट दिली. संतपीठातील विद्यार्थ्यांनी "आजी आनंद उरे, मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा, लाल मातीचा गडी रांगडा" या गीतांचे समुह गायन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष आणि पंडित अरविंद मुळगांवकर तबला कक्ष येथे भेट दिली. विद्यार्थ्यांचे पखवाज वादनाचे व तबला वादनाचे कौशल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.  


या प्रसंगी संतपीठ प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत तसेच संतपीठाचे महत्त्व सांगणारी विद्यार्थ्यांची नाटीका मुख्यमंत्री फडणवीस यांना दाखवण्यात आली. संचालक मंडळातील डॉ.सदानंद मोरे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना संतपीठाची माहिती दिली. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने असे संतपीठ उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांना संत साहित्य देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 



मुख्यमंत्र्यांचा अनोखा सन्मान..


संतपीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा, पगडी, उपरणे, भक्ती आणि नामस्मरणाचे प्रतीक असणारा वीणा, चिपळ्या देऊन अनोखा पद्धतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते अक्षर संस्कार या इंग्रजी, मराठी, हिंदी अशा विविध भाषेतील संत साहित्य पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 


.......

मुख्यमंत्र्यांकडून मुलांचे कौतुक...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतपीठातील गायन कक्षातील मुलांचे विशेष कौतुक केले. तुम्ही सर्वजण खूपच छान व सुंदर गाणे म्हटले. तुमच्या सर्वांचे कौतुक वाटते, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. या मुलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्रदेखील काढले. 

.......

एक लाख ५० हजार वृक्ष लागवड मोहिमेची सुरवात 


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरात १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरवात संतपीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अजानवृक्ष वृक्षाचे रोपण करून करण्यात आला.

-------------