जागतिक पर्यावरण दिनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
पिंपरी, ता. ५ : '' पिंपरी चिंचवड शहराचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी तसेच हवा, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ सारखे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे,'' असे आवाहन पिंपरी चिंचवड महागरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
'वॉक विथ कमिशनर' (चालता-बोलता) या उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता. ५ ) पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान येथे आयुक्त सिंह यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सल, उद्यान अधिक्षक राजेश वसावे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, शैलेश मोरे, सुनिल कदम, विजय घोडके, श्रीकृष्ण काशीद, महाराष्ट्र राज्य मर्दानी खेळ असोसिएशनचे संजय बनसोडे, श्रेयस चव्हाण, शिवदत्त सिंघ, शिवम बाबर, पिंपरी संभाजीनगर रोटरी क्लबचे संतोष गिरांजे, सेवा सारथी फाऊंडेशन संभाजीनगरचे ओंकार मांडगे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘ वॉक विथ कमिशनर ’ उपक्रमाला सुरुवात झाली. उद्यानामध्ये चालताना आयुक्त सिंह यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. यावेळी उद्यान प्रवेश शुल्क सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यापासून ते सुट्टीच्या दिवशी उद्यानात होणारी गर्दी विचारात घेऊन पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्यापर्यंत विविध मुद्दे नागरिकांनी मांडले. आयुक्त सिंह यांनी नागरिकांच्या समस्येचे निराकरण करतानाच महानगरपालिकेकडून शहरात सुरू असलेल्या कामांची माहिती नागरिकांना दिली. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता वाढीबाबत नागरिकांशी संवाद साधला.
आयुक्त सिंह म्हणाले, '' पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून शहरातील वाहनांची संख्याही वाढली आहे. शहरात १०० लोकांमागे ९५ वाहने आहेत. शहरातील हवेची गुणवत्ता वाढीसाठी नागरिकांनी जास्तीतजास्त सार्वजनिक वाहनांचा, मेट्रोचा वापर करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरंपालिकेने शहरातील हवा व वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्वाचे धोरण तयार करण्यात आले आहे. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) मध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये नागरिकांचा सहभागी देखील महत्त्वाचा आहे.
नागरिकांच्या सूचनांचा विचार
नागरिकांच्या आलेल्या सूचनांबाबत बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, '' आज बहुतांश नागरिकांच्या सूचना पर्यावरणाशी संबंधित आल्या आहेत. उद्यानात सोयीसुविधा आणखी वाढवण्याबाबत आलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. उद्यानातील फुडस्टॉलची जागा, गाळे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि महिलांसाठी योगा केंद्र म्हणून वापरण्यासाठी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच महानगरपालिकेच्या वतीने आगामी काळात रस्त्याच्या बाजूला जवळपास ५० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. स्पाईन रोडच्या कडेला बांबू फॉरेस्ट करण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकास सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने झाला आहे. नागरिकांच्या माध्यमातून येणाऱ्या सूचनांचा महानगरपालिकेकडून नेहमीच सकारात्मक विचार केला जातो. महानगरपालिकेच्या कामातील उणीवा या सूचनांमुळे दूर करणे शक्य होते.
'पीसीएमसी @ ५०' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरू
'पीसीएमसी @ ५०' व्हिजन मोहिमेंतर्गत नागरिक सर्वेक्षणाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहराच्या विविध विभागांमध्ये झाली आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या प्रशिक्षित महिलांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी यावेळी केले. ते म्हणाले, ‘२०३२ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या भवितव्याला आकार देण्यासाठी 'पीसीएमसी @ ५०' व्हिजन हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या अनुषंगाने बचत गटांमार्फत शहरामध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देखील सर्वेक्षण फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी व्हावे.’
चिमुकल्याने साधला आयुक्तांशी संवाद
आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत अवनीश भीमराव तंगा (वय ९ ) या लहान मुलाने संवाद साधताना उद्यानापासून जवळच तिरंदाजी (आर्चरी) खेळाचा सराव करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आयुक्त सिंह यांनी देखील चिमुकल्याशी आपुलकीने संवाद साधला. कधीपासून आर्चरी खेळत आहेस, सराव सध्या कसा करतो, याबाबत आपुलकीने चौकशी केली. तसेच तिरंदाजी खेळाचा सराव करण्यासाठी जवळपास जागा उपलब्ध करून देता येईल का, याबाबत माहिती घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
नागरिकांनी केले उपक्रमाचे कौतुक
‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत थेट आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. आयुक्तांसोबत थेट संवाद साधता आल्यामुळे आज आम्हाला ते आमच्याच कुटुंबाचा भाग असल्याचे वाटले. आयुक्तांची पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी असणारी दुरदृष्टी यानिमित्ताने समजली. पर्यावरण संवर्धनासाठी, शहरातील हवेच्या गुणवत्तेसाठी महापालिका प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यानिमित्ताने मिळाली, अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर माजी नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी आभार मानले.
.....
कोट
पिंपरी चिंचवड शहराला पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय दृष्टीकोन समाविष्ट केला जात आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
......
