31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

हरित सेतू प्रकल्पाबाबत जागरूकता वाढविण्यावर महानगरपालिकेचा भर : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी, ता. ११ : '' शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या '' हरित सेतू '' या अभिनव उपक्रमाची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी विविध माध्यमांद्वारे तसेच कार्यशाळांच्या माध्यमातून तरूणांसोबत अनुभवी तज्ञ आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग वाढवून अंमलबजावणी करण्यावर महापालिका भर देत आहे. यामुळे नागरी सुरक्षितता तसेच सार्वजनिक परिसराचे महत्व याबाबत जागरूकता वाढेल आणि नागरिकांचे अभिप्राय समजून घेण्यासही महापालिकेस मदत होईल,'' असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी रविवारी (ता. ११) निगडी येथे केले.

निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील मनोहर दत्तात्रय वाढोकर सभागृहात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी), सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई), डिझाईन शाळा आणि प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स (पीडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने हरित सेतू ब्रँड डेव्हलपमेंट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

या कार्यशाळेस मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार, गिरीश गुठे, स्मार्ट सिटी आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याव्यतिरिक्त डीवाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एसबी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसह ६० हून अधिक नागरिकांनीही या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, '' हरित सेतू हा महापालिकेचा एक महत्वाकांक्षी सायकलस्नेही व पादचारी सुविधांसह सुरक्षितता पुरविणारा प्रकल्प आहे. त्याचा जागतिक पातळीवर उल्लेख झालेला आहे. ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरस्काराने महापालिकेला जागतिक पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्व रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत मिळत आहे. शहरातील रहदारी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित असताना नागरिकांचा प्रतिसाद तसेच त्यांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने विविध कार्यशाळांचे आयोजन केले जात असते ज्यामध्ये तरुणांचा, नागरिकांचा आणि अनुभवी तज्ञांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे हरित सेतू उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातील एक ऐतिहासिक उपक्रम ठरेल, असा विश्वास देखील आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यशाळेच्या सुरूवातीस वास्तुविशारद प्रसन्न देसाई यांनी नागरिकांना प्रस्तावित रस्ते व रचनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. त्यानंतर एक संवादात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले ज्यामध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी हरित सेतू प्रकल्पाची प्रचार प्रसिद्धी विशेषरूपाने/अभिनव पध्दतीने करण्यासाठीच्या नाविन्यपुर्ण कल्पना आणि प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे सुचवून आपली मते तसेच अभिप्राय नोंदविले. या सर्व कल्पनांचा तज्ञांद्वारे प्रकल्पाविषयीचे बोधचिन्ह व त्यास पुरक अशी बोधवाक्य तयार करण्यात येईल.

 ---------------