"हरित सेतू" प्रकल्पाअंतर्गत आकुर्डीत सायकलिंगसंदर्भात सभा
पिंपरी, ता. १९ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या "हरित सेतू" प्रकल्पाअंतर्गत पायी चालणे आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित लॉटरी पद्धतीने निवडण्यात आलेल्या नागरिकांची सहविचार सभा नुकतीच आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर सभागृह येथे यशस्वीरित्या झाली.
या सभेत सहभागी होण्यासाठी, प्रकल्प परिसरातील ९०० नागरिकांना वैयक्तिक निमंत्रण देण्यात आले होते. तसेच परिसरातील १२ शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांची नाव नोंदणी करण्यात आली. एकूण ७३ नागरिकांनी स्वेच्छेने नाव नोंदणी केली त्यापैकी ५५ नागरिकांची वय, सेक्टर, सायकल शिकण्याची तयारी इत्यादी मानांकनाच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. त्यामध्ये २९ महिला आणि २६ पुरुषांचा समावेश होता. या सभेस निगडी प्राधिकरणाच्या विविध सेक्टर मधील १८ महिला,२० पुरुष अशा एकूण ३८ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी विविध सायकल क्लबचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
सभेची सुरुवात प्रसन्न देसाई, आर्किटेक्ट यांच्या सादरीकरणाने झाली. ज्यामध्ये नागरिकांना प्रस्तावित रस्ते व रचनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी प्रकल्पामध्ये त्यांना काय आवडले, काय सुधारू शकते आणि कोणकोणती आव्हाने येऊ शकतात यावर आपले अभिप्राय दिले. त्यानंतरच्या सत्रात निगडी प्राधिकरण भागात सायकलिंग करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी नागरिक स्वतः काय करू शकतात? आपल्या भागातील नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहित कसे करता येईल? इतर वाहन चालकांनी सायकलस्वारांप्रती आदराने वागावे यासाठी काय करता येईल? मुलांसाठी आणि प्रौढांसाठी सायकलिंग प्रशिक्षण सुविधा कशी उभारता येईल? बालक आणि प्रौढ व्यक्तींना सायकल शिकायची असेल तर त्यांचे प्रशिक्षिण कसे करता येईल? शालेय विद्यार्थ्यांसाठी पायी आणि सायकलने जाणे अधिक सुरक्षित कसे करता येईल? या प्रश्नांवर सहभागी नागरिकांनी आपली मते नोंदवली. सहविचारातून आलेल्या कल्पना आणि सूचनांचा प्राधान्यक्रम नागरिकांच्या मतदानाने ठरविण्यात आला. या नागरिकांच्या सूचनांची यादी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस सादर करण्यात येईल आणि हरित सेतू प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये महानगरपालिकेद्वारे विचारात घेतल्या जातील.
या नागरिक सभेची संकल्पना आणि कार्यपालन पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE) मार्फत करण्यात आले. यासाठी प्रसन्न देसाई आर्किटेक्ट (PDA) आणि आय. टी. डी. पी. या संस्थांनी सहकार्य केले. पर्यावरण शिक्षण केंद्राच्या डॉ. संस्कृती मेनन, अमरनाथ करण, अवधूत अभ्यंकर, कुणाल जैसवाल यांनी विशेष प्रयत्न केले. डॉ. अविनाश मधाळे यांनी कार्यशाळा सहजकर्ता म्हणून काम पाहिले. महानगरपालिकेतर्फे बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक नियोजन विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच सुनील पवार, गिरीश गुट्टे हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-------------------
