30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए भूसंपादन करणार

पिंपरी, ता. १७ : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या भागातील प्रमुख सहा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी संबंधित शेतकऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.


या कामांमुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार असून विकासाला गती मिळणार आहे. बैठकीत रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेची रूपरेषा आणि कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत धोरणात्मक चर्चा झाली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले.


हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन संबंधित शेतकऱ्यांची संवाद आणि समन्वय ठेवूनच करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, अधिक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, परवानगी व नियोजन विभागाचे श्रीकांत प्रभुणे आदी अधिकारी उपस्थित होते.

-------------