घरबसल्या भरा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर!
पिंपरी, ता. २ : शहरातील नागरिकांना घरबसल्या जास्तीत-जास्त सुविधा देण्याचा महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचा प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने कर संकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
नागरिकांना मोबाईलवरून कुठेही असताना कर भरण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवर कस्टमाइज्ड पेमेंट लिंक असणारा संदेश महानगरपालिकेकडून पाठवण्यात येत आहे. या लिंकवर क्लिक केले की नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे बिल दिसते, त्यानंतर नागरिक खातरजमा करुन कर भरू शकतात. परंतु ऑनलाइन कर भरताना नागरिकांनी ज्या संकेतस्थळावर कर भरत आहोत ते महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ असल्याची खात्री करावी.
शहरात एकूण ७ लाख ३१ हजार मिळकतींची नोंद आहे. कर संकलन विभागाच्या अनेक सेवा ऑनलाइन झाल्यामुळे, ज्या नागरिकांनी अद्यापही मालमत्ता बिलाशी मोबाईल क्रमांक जोडलेले नाहीत, त्यांनी तात्काळ जोडावेत. त्यानंतर सर्व सेवांचा लाभ घरबसल्या घेता येणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे. सध्या ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना सामान्य करात चार टक्क्यांची सवलत देण्यात येत आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.......
कर संकलन विभागाच्या ऑनलाइन सेवा
कर भरणा
मालमत्ता हस्तांतर
मालमत्ता कर सवलत योजना
थकबाकी नसल्याचा दाखला
...........
कोट
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोप्या व जलद सेवा देणे, हा आहे. नागरिकांना ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेचा लाभ घेतल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचवणार आहे. भविष्यात अशीच आणखी सुलभ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
.....
कोट
ज्या नागरिकांनी मोबाईल क्रमांक आपल्या मालमत्तेशी जोडलेले आहेत, त्यांना ऑनलाइन सेवांचा लाभ मिळत आहे. तरी ज्यांनी अद्याप मोबाईल क्रमांक जोडले नाही, त्यांनी ते तात्काळ जोडून घ्यावे. जेणेकरून त्यांना घरबसल्या कर संकलन विभागाच्या सेवांचा लाभ घेता येईल.
— अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
.....
