बेघरांनी घेतली मतदानाची शपथ
पिंपरी, ता.१७ : “आम्ही बेघर असलो तरी येणा-या विधानसभा निवडणूकीत आम्ही आमच्या मतदान कार्डाच्या आधारे मतदान करणार आहोत.” असे सांगून भारताच्या कानाकोप-यातून येऊन पिंपरी येथील निवारा केंद्रामध्ये वास्तव्य करणा-या ६२ बेघर रहिवासी मतदारांनी मतदानाची शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा पुरस्कृत “रियल लाईफ, रियल पिपल” या पिंपरी चौक येथील सावली निवारा केंद्रामध्ये मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मतदानाचा निर्धार करण्यात आला.
सावली निवारा केंद्रातील बेघर रहिवासी मतदारांना आज “ आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेतली.
भारताच्या विविध राज्यातून आलेले बेघर स्त्री पुरुष रहिवासी पिंपरीतील सावली निवारा केंद्रात २४ खोल्यांमध्ये तात्पुरत्या वास्तव्यास असून ते सुमारे २ ते ४ वर्षांपासून येथे वास्तव्य करतात. त्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष हुसेन शेख यांनी विशेष प्रयत्न केले असून लोकसभा निवडणूकीपूर्वी त्यांना मतदानाची ओळखपत्र काढून दिली आहेत. त्या आधारे त्यांनी लोकसभा निवडणूकीत मतदान केले आणि आता ते विधानसभा निवडणूकीत मतदानासाठी उत्सुक आहेत.
आजच्या मतदान जनजागृती कार्यक्रमातील त्यांच्या काही प्रतिक्रिया –
सुनील जोशी- मी बेघर असून चार वर्षापूर्वी या निवारा केंद्रात वास्तव्यास आहे. माझे वय ६५ वर्षे असून माझी ही विधानसभा निवडणूक मतदानाची दूसरी वेळ आहे. यापूर्वी मी मे महिन्यातील लोकसभा निवडणूकीसाठी प्रथमत: मतदान केले आहे. याद्वारे मी सर्वांना आवाहन करतो की, आम्ही बेघर असून निवारा केंद्रात राहून मतदान करणार आहोत तसेच शहरातील प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे.
आनंदी साबळे- मी ७१वर्षांची असून माझी ही मतदानाची सहावी वेळ आहे. मी मतदान करणार असून लोकशाही बळकट करण्यासाठी शहरवासियांनो तुम्हीही मतदान करावे.
या कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, निलेश जगताप, महादेव डोंगरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी “रियल लाईफ, रियल पिपल” या संस्थेचे अध्यक्ष एम.ए.हुसेन, व्यवस्थापक गौतम थोरात, सहाय्यक व्यवस्थापक सचिन बोधनकर, सोशल वर्कर अग्निस फ्रान्सिस यांचे सहकार्य लाभले.
-----