30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

बो-हाडेवाडीमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी, ता. २१ : ' क ' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी येथील गट क्र.२३३ व २३४ इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सुमारे १८ हजार चौरस फूटाची अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई मंगळवारी (ता. २१) करण्यात आली.


 दोन पोकलेन आणि तीन जेसीबी यांच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत नऊ दोन मजली बांधकामे,दोन तळमजल्यापर्यतची बांधकामे, दोन जोत्यापर्यतची बांधकामे अशी एकुण १२ हजार चौरस फूटाची आर.सी.सी. बांधकामे आणि चार पत्राशेडची एकूण ६ हजार चौरस फुट अशा १८ हजार चौरस फूटांचे अतिक्रमण निष्कासीत करण्यात आले.


 आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तसेच शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अतिक्रमण कारवाईत उपायुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, उप-अभियंता सूर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, किरण सगर, बीट निरीक्षक श्रीकांत फाळके त्याचप्रमाणे भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे गणेश जामदार, किरण पठारे, ३० पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २२ सुरक्षा रक्षक, अतिक्रमण आणि अग्निशामक पथकाचे जवान, वैद्यकीय विभागातील रूग्णवाहिकेचा समावेश होता.


कोट-


 शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यापुढेही चालू राहणार असून शहरातील नागरिकांनी रितसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, अनधिकृत बांधकामे करू नयेत असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

-------------------