अरणमध्ये भक्त निवासचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
पिंपरी, ता. २९ : लोक वर्गणीतून जमा झालेल्या ५० कोटी निधीतून तीर्थक्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर ) येथील संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सावता महाराज भक्त निवास व वास्तुशिल्पाचे भूमी पूजन व भक्त परिवार मेळाव्याचे रविवार (ता. ४ ऑगस्ट) रोजी दुपारी १२:३० आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , गृह व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार समीर भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार योगेश टिळेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार प्रज्ञाताई सातव यांसह केशव महाराज उखळीकर, महामंडलेश्वर मनीषा नंद महाराज, रखमाजी महाराज नवले, भक्तीदासजी महाराज शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून सुमारे ५ हजार भक्त उपस्थित राहणार आहेत.
अरण (ता. माढा) हे संत शिरोमणी सावता महाराज यांचे गाव , अकराव्या शतकापासून जगाला कर्मनिष्ठेचा संदेश देणारे हे वारकरी संप्रदायाचे प्रथम संत म्हणून सर्वपरिचित आहेत. शिवाय त्यांची संजीवनी समाधी देखील तेथेच आहे. परंतु अशा पवित्र तिर्थक्षेत्र स्थळी आजपर्यंत कुठलाही विकास झालेला नाही. महाराष्ट्रातील हे तीर्थक्षेत्र अजूनही विकासापासून कोसो दूर आहे.
प्रास्तावित भक्तनिवास व सावता महाराजांच्या कार्यावर आधारित वास्तुशिल्प कलेचा नमुना आहे. या कार्यक्रमास राज्यातुन एक लाख भाविक येणार आहेत, अशी माहिती देहु येथील संस्थेचे सचिव प्रभु महाराज यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------
