अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये
पिंपरी, ता. १२ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत २०२४ - २०२५ या शैक्षणिक वर्षात काही खाजगी तसेच प्राथमिक शाळा सरकारची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. यामध्ये एकूण १२ शाळांचा समावेश आहे आणि या शाळा बंद करण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. असे असतानाही या शाळा अनधिकृतरित्या चालू ठेवण्यात आल्या असून या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पिंपळेनिलखमधील गांधीनगर येथील पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, विशालनगर येथील चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळगुरवमधील जवळकरनगर येथील आयडीएल इंग्लिश स्कूल, च-होली येथील स्टारडम इंग्लिश मिडीयम स्कुल, चिंचवडेनगर येथील लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल, वाल्हेकरवाडी लक्ष्मीनगर येथील नवजित विद्यालय, पिंपळे सौदागर येथील किड्सजी स्कुल, सांगवी येथील एम.एस. स्कुल फॉर किड्स, चिंचवड येथील क्रिस्टल मॉर्डन स्कुल तसेच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल , कासारवाडी येथील माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कुल आणि डी.एम. के. इंग्लिश स्कुल या शाळांचा समावेश आहे.
शैक्षणिक नुकसानीस पालक जबाबदार
अनधिकृतरीत्या चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास त्यांच्या पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस पालक स्वत: जबाबदार राहतील, असा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
कोट – ... अन्यथा होणार कारवाई
शाळांच्या संस्थाचालकांनी सरकारची परवानगी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. अनधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याबाबत महाराष्ट्र सरकार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या सरकार निर्णयानुसार त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली आहे.
-------------