30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

अनधिकृत फलकांविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र

पिंपरी, ता. २२ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई तीव्र केली असून गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३६ हजार अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि किऑक्स हटविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अनधिकृत फलकधारकांकडून आतापर्यंत सुमारे ४७ हजार रुपये दंड वसूल केला असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात २ गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.


१४ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पहिल्या मोहिमेमध्ये २८ हजार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्यात आले. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या दुसऱ्या मोहिमेमध्ये अतिरिक्त ८ हजार अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.


अनधिकृत फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच शहरातील पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. शहरात स्वच्छ पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून यापुढेही अनधिकृत फलकांवर कारवाई सुरूच राहणार आहे. यामध्ये नागरिकांचे आणि विशेषत: फलकधारकांचे सहकार्य महत्वाचे असून त्यांनी महापालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.


- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


----------------