31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेकांनी घेतली आ. अण्णा बनसोडे यांच्यासाठी माघार

पिंपरी, ता. ४ : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व मित्र पक्ष सज्ज आहेत. पिंपरी विधानसभेतून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली. 

   चिंचवड येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, भाजपचे नेते व समन्वयक सदाशिव खाडे, आरपीआय आठवले गटाचे नेते परशुराम वाडेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माघार घेतलेल्या उमेदवारांपैकी आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक काळूराम पवार, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, हेमंत मोरे, सुरेश लोंढे, रीता सोनवणे, चंद्रकांत लोंढे आदींसह माघार घेतलेले इतर उमेदवार उपस्थित होते.

  यावेळी योगेश बहल म्हणाले, '' केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परशुराम वाडेकर यांना फोन केला. त्यांच्यामार्फत चंद्रकांता सोनकांबळे यांच्याशी बोलणे झाले. भविष्यात त्यांना आरपीआयच्या कोट्यातून एखादे महामंडळ किंवा सरकारी पदावर घेण्यासाठी प्रयत्न करू, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परशुराम वाडेकर यांच्यामार्फत सोनकांबळे यांना सांगितले आहे. तसेच मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोनकांबळे यांच्याशी बोलणे करून दिले. आठवले आणि अजित पवार यांच्या शब्दाला मान देऊन सोनकांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांचा मार्ग आता सुकर झाला आहे.

  परशुराम वाडेकर म्हणाले, '' आरपीआय आठवले गटाने या विधानसभा निवडणुकीत १२ जागा मागितल्या होत्या. गेली १५ वर्षे आम्ही महायुतीत आहोत. २०१४ च्या निवडणुकीत चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरी मतदारसंघातून ४७ हजार मते घेतली होती. यावेळी ही आम्ही वाट पाहिली, मात्र मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला न आल्याने आमचा रुसवा संपला आहे. आता खांद्याला-खांदा लावून आम्ही काम करू. सोनकांबळे यांना महामंडळ किंवा महिला आयोगासारखे आरपीआय आठवले गटाच्या कोट्याला येणारे महामंडळ देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. तिन्ही मतदारसंघात आम्ही काम करू. अपक्ष म्हणून अर्ज भरताना चंद्रकांता सोनकांबळे यांनी दिलेला आरपीआय आठवले गटाचा राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, '' सन २०१४ च्या निवडणुकीत शिलाई मशीन हे चिन्ह असतानाही मला ५० हजार मते आरपीआय च्या तिकिटावर मिळाली होती. २०१९ मध्ये मला तिकीट नाकारण्यात आले. आताही विद्यमान आमदारांमुळे मला तिकीट मिळाले नाही. मग संधी कधी मिळणार ? या भावनेतून मी अर्ज भरला होता. मात्र रामदास आठवले यांनी आपल्या उमेदवारीने महायुतीचा पराभव होईल, त्यात अर्थ नाही असे सांगितले. महामंडळासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आपण माघार घेतल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले.'' 

  आमदार आण्णा बनसोडे म्हणाले, '' महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा राबवली जाईल. इच्छुक राहण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो, मात्र उमेदवारी एकालाच मिळते. माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, काळूराम पवार यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून दिला. योगेश बहल यांची शिष्टाई यशस्वी ठरली असून आता सोनकांबळे, ननावरे, पवार यांच्यासह माघार घेणाऱ्या सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र काम करणार आहोत.'' 

  जितेंद्र ननावरे म्हणाले, '' महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी माघार घेतली आहे. ''  बाबा कांबळे म्हणाले की, '' कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले,'' ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आपण माघार घेत आहे.

  काळूराम पवार म्हणाले, '' उमेदवारी न मिळाल्याचे मनात दुःख असते पण शेवटी पक्ष मोठा आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाऊ व जिंकू.''  

  यावेळी आरपीआयचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश निकाळजे, माजी नगरसेवक संतोष लोंढे, अंकुश कानडी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, धर्मेंद्र उर्फ बबलू सोनकर आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------