पिंपरीत सरकारी जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ ची नियोजन बैठक
पिंपरी, ता. १२ : यंदाच्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धेत ९३ खेळांचा असून कोणताही गुणवत्ता असलेला विद्यार्थी खेळापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. स्पर्धेचे बदलते नियम व मार्गदर्शक तत्वांबाबत शिक्षकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी नुकतेच पिंपळे गुरव केले .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या यंदाच्या सरकारी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची नियोजन बैठक नुकतीच पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे शुक्रवारी( ता. ११ ) रोजी झाली. या बैठकीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे बोलत होते.
या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, क्रीडाधिकारी दादासाहेब देवकाते, महानगरपालिकेचे प्रभारी क्रीडाधिकारी रंगराव कारंडे, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, दिव्यांग भवन फाउंडेशनचे परेश गांधी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी व महापालिका शाळांचे क्रीडाशिक्षक व शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये बैठकीत स्पर्धेच्या नियोजनाची रूपरेषा ठरविणे, सहभागी शाळांची नोंदणी प्रक्रिया व पात्रता निकष निश्चित करणे यांचा समावेश होता. यंदा होणाऱ्या ९३ खेळांचे आयोजन, त्यांचे वेळापत्रक आणि त्यासाठी लागणाऱ्या क्रीडा सुविधा व मैदानांचे नियोजन यावर भर देण्यात आला. तसेच स्पर्धेसाठी परीक्षक, स्वयंसेवक आणि आयोजक यांची नियुक्ती कशी करावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गटातून स्पर्धांचे आयोजन करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि निवासाची सुविधा याचे प्रभावी नियोजन कसे करावे, यावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक तज्ञ मार्गदर्शक व खेळाडू यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हरिभाऊ साबळे व श्री. दीपक कन्हेरे यांनी केले. प्रभारी क्रीडा अधिकारी श्री. रंगराव कारंडे व बाळाराम शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—----
कोट -
आगामी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व शाळा यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.महानगरपालिकेने हॉकी,तिरंदाजी, कुस्ती,नेमबाजी, घोडेस्वारी, या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी अकॅडमी मार्फत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.तसेच सर्व खेळासाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ सर्व शाळांनी, खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत असून विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे.
- पंकज पाटील, उप आयुक्त क्रीडा व सांस्कृतिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
--------------
