जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त पिंपरीत बैठक
पिंपरी, ता. ३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट २०२४ पासून शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले असून या स्पर्धेच्या नियोजनाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता. ५) सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ साठी मागील वर्षीप्रमाणेच सर्व खेळांच्या प्रवेशिका ऑनलाईन स्विकारल्या जाणार आहेत. खेळाडूंची नोंदणी, प्रवेशिका नोंदणी याबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले जाणार असून स्पर्धेच्या आयोजन स्थळाबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. महापालिका शाळांसोबत खाजगी शाळा (संस्था) विविध खेळांच्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास इच्छुक असल्यास त्याबाबतची पत्रेही आयोजित सभेत स्विकारली जाणार आहेत.
सरकारने प्रत्येक शाळेस किमान २ सांघिक खेळामध्ये व एका वैयक्तिक खेळामध्ये सहभागी होण्याचे सक्तीचे केले असल्यामुळे, शाळा प्रमुखांनी आपल्या शाळेमधील जास्तीत जास्त संघ या स्पर्धेमध्ये सहभागी करावेत. तसेच महापालिका हद्दीतील सर्व महापालिका आणि खाजगी शाळेतील प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक, संगणक ऑपरेटर यांनी मंगळवारी (ता. ५) आयोजित बैठीकीस उपस्थित रहावे, असे आवाहन क्रिडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.
------
