24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

मोदींच्या नेतृत्वाखाली आणणार शिवशाही आणि रामराज्य - नितीन गडकरी


कर्जत, ता. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात 'शिवशाही' व 'रामराज्य' आणायचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. ७) सांगितले. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर होता, खरा चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे, असेही ते म्हणाले. 


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यात चौक फाटा येथे झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार बारणे, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, सुरेश लाड, ज्येष्ठ नेते अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.


नितीन गडकरी म्हणाले, '' प्रत्येकाला घर, गावागावात पाणी, शाळा, दवाखाना, रस्ता, वीज, शेतीमालाला भाव व रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाला भय, भूक, दहशतवाद व भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 'शिवशाही' आणि प्रभू रामचंद्रांचे 'रामराज्य' आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मावळच्या मतदारांनी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे.''  


'रस्ते विकासामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती,'


कळंबोली जंक्शन येथील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून बहुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार असून सुमारे १६०० कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभारण्यात येईल. हे कामही निवडणुकीनंतर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. 


काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला होता, पण त्यातून फक्त काँग्रेसवाल्यांची गरिबी दूर झाली, असा टोलाही त्यांनी लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे पुण्यात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. बारणे हे प्रत्येक कामाचा चिकाटीने पाठपुरावा करतात. त्यामुळे ती सर्व कामे आम्हाला करावी लागतात, असे ते म्हणाले. 


विकासासाठी गडकरी यांचे पाठबळ - बारणे


मावळातील विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल बारणे यांनी गडकरींना विशेष धन्यवाद दिले. अटल समुद्र सेतू, पनवेल-उरण महामार्ग हे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच चौक ते पागोटे रस्ता, देहूरोड ते वाकड उड्डाणपूल यासाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. कळंबोली जंक्शन बहुमजली उड्डाणपूल व कर्जत ते भीमाशंकर या रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल, असे बारणे यांनी सांगितले. पनवेल- नवी मुंबई येथील दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 


आमदार महेश बालदी यांनी प्रास्ताविकात उरण तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. खासदार बारणे यांना उरण तालुक्यातून ४० ते ५० हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

-----------