30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

पुण्यात दि. ३ व ४ ला महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन

पुणे, ता. २ : महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात मंगळवारी (दि. ३) व बुधवारी (दि. ४) पुणे परिमंडलकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलांच्या नाट्यकृती सादर होणार आहेत. महावितरणमधील रंगकर्मींच्या दर्जेदार अभिनयाची मेजवानी देणाऱ्या नाट्यकृती पाहण्यासाठी नाट्यरसिकांना प्रवेश विनामूल्य आहे.


महावितरणमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आंतरपरिमंडलीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (ता. ३) सकाळी १० वाजता महावितरणचे संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता सुनील काकडे (पुणे), धर्मराज पेठकर (बारामती) व स्वप्निल काटकर (कोल्हापूर) उपस्थित राहतील.


    या स्पर्धेत मंगळवारी (ता.  ३) सकाळी १०.३० वाजता पुणे परिमंडलकडून अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ ही नाट्यकृती सादर होईल. तर सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर परिमंडलाकडून चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’ नाटकाचा प्रयोग होणार आहे.


नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर होईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरणचा कार्यक्रम होईल. विजेत्या नाट्यसंघास करंडक तर विजेत्या कलाकारांना वैयक्तिक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेता नाट्यसंघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

--------------