32.86°C Pune
Monday, May 20
image

प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सजग झाले पाहिजे - विनोद बोधनकर

पिंपरी, ता. २८ : '' माणसाच्या पुढच्या पिढीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व प्लास्टिकमुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सावधान झाले पाहिजे. यासाठी शाळांमध्ये भूगोलाबरोबरच " भूजलगोल " शिकवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली पाहिजे,'' असे प्रतिपादन पर्यावरणतज्ञ विनोद बोधनकर यांनी नुकतेच चिंचवड येथे केले.

गांधी पेठ तालीम मित्र मंडळ ही पिंपरी चिंचवड शहरातील एक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे (वर्ष ३४ वे) तिसरे पुष्प गुंफताना बोधनकर यांनी "प्रदूषण नदीचे व प्लास्टिकचे" या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, हिरामण भुजबळ, राजू घोडके, गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, नवनाथ सरडे,धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम आदी उपस्थित होते.

व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि.२८) निवृत्त न्यायाधीश संजय भाटे यांच्या " माझे संविधान माझा अभिमान " या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.

  यावेळी बोधनकर म्हणाले, '' एक विद्यार्थी दोन पालकांमध्ये जागृती करतो. पुणे, पिंपरी चिंचवड मधील शाळांमधून अठरा हजार पाचशे विद्यार्थी दरमहा "सागरमित्र" या पथदर्शी प्रकल्पांतर्गत दहा टन प्लास्टिक गोळा करतात. हे प्लास्टिक रिसायकल केले जाते. विद्यार्थी पालकांबरोबरच समाजातील सर्व घटकांनी प्लास्टिक मुक्त वसुंधरा करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा. यासाठी पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या बंद करून स्टीलच्या बाटलीचा वापर करावा. तसेच प्लास्टिक कॅरीबॅगऐवजी ज्यूटच्या, कापडी पिशव्यांचा वापर करावा. अमेरिका, सिंगापूरसारखी विकसित राष्ट्रे विकसनशील व मागास राष्ट्रांपेक्षा कैक पटीने जास्त प्लास्टिकचा वापर करतात. यातील दहा टक्के रिसायकलसाठी जाते. उर्वरित जमिनीवर पडून राहते ते नदीतून समुद्रात मिसळले जाते. हे प्लास्टिक विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात. समुद्रातील प्लास्टिकमुळे जलचर धोक्यात आले आहेत. तसेच ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या खारफुटीच्या समुद्री वनस्पतींचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. प्लास्टिक आणि नदी नाल्यात जाणाऱ्या प्रदूषणयुक्त पाण्यामुळे नदीतील जलचर मृत पावतात. पूर्वी पुण्यातील मुळा, मुठा नदीत ८० प्रकारच्या विविध माशांच्या प्रजाती व इतर जलचर होते. आता फक्त चिलापी आणि मांगुर या परदेशी माशांचे अस्तित्व टिकून आहे. प्लास्टिकचा वापर थांबवा हे आपण म्हणतो, परंतु पुढची ४० वर्षे अमर्याद प्लास्टिक वापरले जाणार आहे. यासाठी भांडवलदार उद्योजकांनी गुंतवणूक करून प्रकल्प उभारले आहेत. माणसाबरोबरच जलचरांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आता प्रत्येकाने " जिवोत्तम " झाले पाहिजे. यातून स्वच्छता आणि अहिंसा दोन्ही हेतू साध्य होतील असेही बोधनकर यांनी सांगितले.

 संजय कुलकर्णी म्हणाले, '' पाच वर्षांपूर्वी पवना नदीत पोहता येत होते. दहा वर्षांपूर्वी येथील पाणी पिता येत होते. आता पवना आणि इंद्रायणी नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. याला " विकास " जबाबदार आहे. घरातील बेसिन ते नदीपर्यंत प्रदूषण आहे. नदीच्या या प्रदूषणास पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार नसून नदीकिनारी असणारे नागरिक व नागरिकरण जबाबदार आहे. संदीप जंगम यांनी स्वागत केले. राजाभाऊ गोलांडे यांनी आभार मानले.

--------------------------------------