32.86°C Pune
Monday, May 20
image

मराठा महासंघ, खान्देश तिळवण तेली समाज मंडळाचा बारणे यांना पाठिंबा


चिंचवड, ता. २ : अखिल भारतीय मराठा महासंघ, खान्देश तिळवण तली समाज मंडळ, माजी सैनिक संस्था अशा विविध संस्था संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 


अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार बारणे यांना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले. पत्रावर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष संतोष भांगरे, सरचिटणीस संजय देसाई यांच्या सह्या आहेत. 


मराठा महासंघाने पाठिंबा पत्रात असे म्हटले आहे, '' सरकारच्या विविध खात्यांमध्ये निवड झालेल्या  २,२०० तरुणांना आरक्षण रद्द झाल्यामुळे नियुक्तीपासून वंचित रहावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बसून या मराठा तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. 


२०१६ मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला शिक्षणात १३ टक्के तर नोकरीत १२ टक्के आरक्षण दिले. मराठा तरुण तरुणींना नवसंजीवनी ठरणारी सारथी संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून अनेक तरुणांना शासकीय सेवेत संधी मिळाली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ८६,२२० तरुण मराठा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. '' मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने केले आहे. 


खान्देश तिळवण तेली समाजाचा पाठिंबा


पिंपरी-चिंचवड व पुणे परिसर खान्देश तिळवण तेली समाज मंडळाने खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मावळ मतदार संघात या समाजाचे सुमारे पाच हजार मतदार आहेत. मंडळाचे अध्यक्ष अनिल चौधरी व सचिव भरत चौधरी यांनी बारणे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. 

देहूगाव माजी सैनिक संस्थेचा पाठिंबा


श्रीक्षेत्र देहूगाव येथील माजी सैनिक संस्थेने खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल सवालाखे यांनी बारणे यांना पाठिंबा पत्र दिले. सुमारे १६० नोंदणीकृत माजी सैनिकांची कुटुंबे या संस्थेची सभासद आहेत. आम्ही संस्थेसाठी देहूगाव विठ्ठलवाडी येथे सर्वे नंबर ९७ मधील सरकारी जमिनीची मागणी केली असता कोणताही विलंब न लावता खासदार बारणे यांनी न हरकत प्रमाणपत्र देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात व मंत्रालयात पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन केले. खासदार बारणे यांचे संसदेतील कार्यही उल्लेखनीय आहे. सर्वांना जिवाभावाचा वाटणारा, जमिनीवरील लोकनेता भविष्यातही हवा असल्यामुळे माजी सैनिकांच्या परिवारांनी बारणे यांना पाठिंबा दिला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

-------------