32.3°C Pune
Monday, May 20
image

बहारदार नृत्यांनी निगडीत रंगला नृत्य महोत्सव



पिंपरी, ता. १ : नृत्य दिनानिमित्त निगडी येथील नृत्यकला मंदिर व नृत्यतेज अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नृत्य महोत्सव गदिमा नाट्यगृह येथे नुकताच उत्साहात झाला. 


नृत्य गुरू तेजश्री अडीगे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ वा नृत्य महोत्सवाचा समारोप प्रसंगी सिने कलाकार मयुरेश पेम, मनमित पेम, लावणी नृत्य दिग्दर्शक महेंद्र बनसोडे, बॉलीवूडचे नृत्यदिग्दर्शक जिवेंद्र गुजराती, प्रतिभा ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटचे संचालक डॉ दीपक शहा, डॉ शाळीग्राम भंडारी, डॉ अनिकेत काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

तेजश्री अडीगे यांनी निर्माण केलेल्या या परंपराशील महाराष्ट्र नृत्य नाट्याच्या निर्मितीला २५ वर्ष पूर्ण झाली. या प्रित्यर्थ यावर्षीचा नृत्य महोत्सवात महाराष्ट्र हा संकल्पना घेऊन सर्व नृत्य सादर करण्यात आले.

या नृत्य महोत्सवात सर्वप्रथम ' हे गजवदना ', ' वक्रतुंड महाकाय ' या गाण्याने सुरुवात झाली. पाच ते सात वर्षांच्या चिमुकल्यांनी "एकविरा आई तू डोंगरावरी"हे नृत्य बहारदार रित्या सादर केले. नृत्यदिग्दर्शक महेंद्र बनसोडे यांनी सादर केलेल्या वासुदेव नृत्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य पातळीवर झालेल्या स्पर्धांमधून प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांनी यावेळी अनेक नृत्य सादर केली. पुरस्कारार्थी पुरूष लावली कलावंत फिरोज मुजावर यांनी सादर केलेल्या सवाल-जवाब लावणीला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.


११ ते १४ या वयोगटातील विद्यार्थिनींनी गोंधळी गीत, ठाकर, जोगवा नृत्य सादर केला. २० - २० मुलींच्या विविध गटात नृत्य सादर करून त्यांनी प्रेक्षकांच्या टाळ्याची दाद मिळवली .

तसेच कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात कॉन्टेम्परीया नृत्यशैलीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे नृत्य दाखवण्यात आले. बॉलीवूड प्रकारातील नृत्य छोट्या व मोठ्या मुलींनी आकर्षकरित्या केली.

नृत्य कला मंदिरच्या ७५ विद्यार्थिनींनी वेगवेगळे नृत्य प्रकार तन्मयतेने व जोशपूर्ण सादर केले.

यातील १८ मुलींचा उत्कृष्ट शिबिरार्थी असा गौरव करण्यात आला.


निमंत्रित असलेल्या कल्याण वरून आलेल्या पुरस्कारार्थी स्वरा पानसरे या फक्त नऊ वर्षाच्या मुलीने पारंपारिक लावणी सादर करून वाहवा मिळवली. मुंबई विभागात प्रथम आलेल्या व पुणे विभागातून प्रथम आलेल्या स्पर्धकांमध्ये महाअंतिम स्पर्धा झाली. (मेगा फायनल). त्याचे परीक्षण एकापेक्षा एक चा विजेता मयुरेश पेम तसेच टाईमपास फेम मनमित पेम यांनी केले.


नृत्य कला मंदिर संस्थेच्या वतीने यावेळी विविध पुरस्कार देण्यात आले. पुरस्कारार्थी व पुरस्कार पुढीलप्रमाणे-


लावणी पुरुष कलावंत फिरोज मुजावर (उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक), स्वरा पानसरे (उत्कृष्ट बालकलाकार),

वीणा भोसले (उत्कृष्ट युवा कलाकार), विवा शेटे, आर्वी कुरकुटे, व वंशिका यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मयुरेश पेम म्हणाले, खूप सुंदर रित्या सादरीकरण झाले. बक्षीसांमुळे आत्मविश्वास वाढतो. मुलांनी एकमेकांकडून शिकले पाहिजे.


महा अंतिम स्पर्धा मेगा फायनल बक्षीस


प्रथम क्रमांक- डीडब्ल्यू एन क्रिव -अकरा हजार रुपये रोख

द्वितीय क्रमांक-एसडीए ग्रुप-सात हजार रुपये

तृतीय क्रमांक-सूर्यनमस्कार ग्रुप-पाच हजार रुपये

प्रास्ताविक तेजश्री अडिगे यांनी तर नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया धाइंजे यांनी नृत्यकला मंदिर तर्फे सर्वांचे आभार मानले.

----------